29 June 12:37

पुणे वेधशाळेचे दैनंदिन हवामान अंदाज बंद; केंद्रीय पद्धतीने दिले जाणार अंदाज


पुणे वेधशाळेचे दैनंदिन हवामान अंदाज बंद; केंद्रीय पद्धतीने दिले जाणार अंदाज

कृषिकिंग, पुणे: गेली नव्वद वर्षे पुण्याची ओळख बनलेल्या पुणे वेधशाळेचे विशेषतः दैनंदिन हवामान अंदाज विभागाचे काम बंद करण्याचा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) घेतला आहे. यापुढे देशभरातील सर्वच स्थानिक विभागांचा हवामान अंदाज दिल्लीवरून केंद्रीय पद्धतीने जारी होणार असून, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम स्थानिक हवामान केंद्रांद्वारे केले जाणार आहे. महाराष्ट्रासाठीचा अंदाज प्रसिद्ध करण्याची जबाबदारी आता मुंबई केंद्राकडे देण्यात आली आहे. त्यामुळे हवामान अंदाजासाठी देशभरात पुण्याचे असणारे महत्त्व आता इतिहासजमा झाल्याचे स्पष्ट आहे.

सिमला येथून पुण्यात स्थलांतर झाल्यानंतर एक एप्रिल १९२८ पासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत आयएमडीचे राष्ट्रीय मुख्यालय पुण्यात होते. त्यानंतर मुख्यालय दिल्लीला हलवले गेले. मात्र, स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील हवामान अंदाजाची जबाबदारी पुण्यातील केंद्राकडे राहिली. त्यासाठी उपमहासंचालक (हवामान अंदाज) आणि पुणे वेधशाळा संचालक अशा दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पुणे वेधशाळेचे काम सुरू होते. आता ही दोन्ही पदे बाद करण्यात आली असून, पुण्यातील केंद्राकडे देशभरातील हवामानाच्या नोंदी दिल्ली आणि मुंबई केंद्राकडे पाठवण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने हवामान अंदाज देण्याच्या आयएमडीच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजाचे कौशल्य लोप पावणार आहे.



टॅग्स