27 December 10:19

पुढचा गळीत हंगाम अडचणींचा; हंगाम कार्यक्रमाची आखणी करा- पवार


पुढचा गळीत हंगाम अडचणींचा; हंगाम कार्यक्रमाची आखणी करा- पवार

कृषिकिंग, पुणे: “राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक असून, पुढील गळीत हंगाम कार्यक्रमाची आखणी करावी,” अशी सूचना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४१व्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या वेळी उपस्थित होते.

“देशात सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले असल्याने, काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुढील गळीत हंगामाला होईल. त्यामुळे आत्तापासूनच पुढच्या गळीत हंगामाची तयारी करावी. कदाचित पुढील हंगामात कारखाने लवकर सुरू करावे लागतील. तसे न केल्यास कारखाने जूनपर्यंत चालू ठेवावे लागतील. परिणामी, साखरेच्या उताऱ्यात घट होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची योग्य किंमत देताना कारखान्यांना कसरत करावी लागेल.” असे पवार यांनी पुढे बोलताना सांगितले आहे.

उसाचे उत्पादन वाढल्यास इथेनॉल करण्याची शिफारस अनेकांनी केली आहे. ब्राझिलसारख्या देशात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केला जातो. ती पद्धत भारतासाठी सध्या अनुकुल नाही. ही पद्धत अधिक खर्चिक असल्याचे प्रयोगावरुन लक्षात आले आहे. त्यामुळे कारखान्यांनी मोलॅसिस साठवून, पुढे त्याचा वापर इथेनॉलसाठी करावा. त्याचबरोबर खर्चात काटकसर करावी, साखरेच्या उत्पादनखर्चात कपात कशी होईल याचे नियोजन केले पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले.