31 May 10:22

पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश


पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

कृषिकिंग, मुंबई: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बैठकीला उपस्थित होते.

यावर्षी पावसाळा वेळेवर आणि चांगला होणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पेरणीचे आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल. ज्या विमा कंपन्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना रक्कम मिळेल यासाठी तत्परता दाखवावी. विमा कंपन्यांनी क्षेत्रिय स्तरावर अधिक गतीने काम होण्यासाठी मनुष्यबळदेखील वाढवावे. ज्या खातेधारक शेतकऱ्यांची माहिती पडताळणी होत नाही. अशावेळी विमा कंपन्यांनी या खातेदारांची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करावी, असे निर्देश केंद्र शासनानेदेखील यापूर्वीच दिले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

थेट लाभ हस्तांतरित करण्याकरिता ज्या लाभार्थ्याने बँक खाते उघडले त्याची अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी जमा होणारी यंत्रणा तयार करता येईल का, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर लाभार्थ्यांना देण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच खरीप २०१८ साठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून, विमा कंपन्या व बँकांनी समन्वयातून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत योजनेत सहभागासाठी अर्ज करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.