18 July 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या करपा रोगाचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील काळ्या करपा रोगाचे नियंत्रण

काळा करपा: महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो. हा रोग कोलिटोट्रायकम ग्लेओस्पोराईडस नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागातात. ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने वाळतात. एका पाठोपाठ पाने वाळत गेल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. खरीपातील दमट आणि उबदार हवामनात या रोगाचा बुरशीची वाढ झपाटयाने होते. पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ वातावरण आणि सतत झिमझिम पडणारा पाऊस यामुळे रोगाचे प्रमाण वाढते व माना लांब होतात. या रोगाची सुरुवात फुलकिडयांने पातीवर केलेल्या जखमेमुळे होते. म्हणून या फुलकिडयांचे नियंत्रण केल्यास हा रोग लवकर आटोक्यात येतो.

नियंत्रणाचे उपाय: मॅन्कोझेब 0.3 टक्के 30 ग्रॅम किंवा कार्बैन्डझिम 0.2 टक्के 20 ग्रॅम औषध 10 लिटर पाण्यात मिसळून दर 12 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. पुनर्लागण करताना रोपे कार्बेन्डझिम किंवा क्लोरोथॅलोनिल कवच या औषधाच्या 0.2 टक्के द्रावणात बुडवून घ्यावीत.

डॉ. कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स