18 October 07:00

पिकांवरील सुत्रकृमीचा प्रादुर्भाव व नियंत्रण


पिकांवरील सुत्रकृमीचा प्रादुर्भाव व नियंत्रण

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर नोव्हेंबर २०१७ अंकात प्रकशित- सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुळांच्या टोकाद्वारे होतो. दोन्ही प्रकारचे सुत्रकृमी मुळांच्या पेशीमधून रस शोषून घेतात. त्यामुळे पेशी मरतात. तसेच मुळांवर जखमा होतात.

सुत्रकृमीच्या काही प्रजाती मुळांवर गाठी तयार करतात. तर काहींमुळे मुळांमध्ये तसेच मुळांवर छिद्र पडतात किंवा तयार होतात. त्यामुळे पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. जमिनीमध्ये पाण्याचा अंश पुरेसा असताना देखील पीक सुकतात किंवा सुकल्यासारखे दिसते.

सुत्रकृमींमुळे आढळून येणारी लक्षणे हे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे भासणाऱ्या लक्षणांसारखीच असतात त्यामुळे बहुतेक वेळा सुत्रकृमींची लक्षणे ही आपल्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. साधारणतः सुत्रकृमींमुळे उत्पादनामध्ये 12-13 टक्के घट होते.
सुत्रकृमीचा प्रसार हा प्रादुर्भावग्रस्त जमिनीत वापरली जाणारी शेतीची अवजारे तसेच चप्पल व बुट यासोबत जाणार्या मातीमधून तसेच प्रादुर्भावग्रस्त रोपांद्वारे, प्रादुर्भावग्रस्त जमिनीतून वाहत जाणाऱ्या पाण्यांमुळे होतो.

सुत्रकृमी विषयी असलेल्या जागरूकतेचा अभाव तसेच सुत्रकृमी नाशकांचा अभाव आणि कमतरता नियंत्रण थोडे कठिण आहे. पण एकात्मिक सुत्रकृमी नियंत्रणाद्वारे सुत्रकृमी नियंत्रण प्रभावीपणे केले जाऊ शकते.

नियंत्रण व उपाय
1) उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी.
2) पिकांची फेरपालट
3) मिश्र पिकांची लागवड
4) हिरवळीची पिके उदा. धैंचा
5) सेंद्रिय खताचा उदा.(निंबोळी/एरंड पेंड) १ टन प्रती हेक्टर याप्रमाणात वापर करावा.
6) प्रादुर्भाव विरहीत रोपांचा वापर करावा.
7) स्युडोमोनस फ्ल्यूरोसन्स किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडीची १० ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणात जैविक बीजप्रक्रिया करावी.
8) कार्बोफ्यूरॉन ०.३ ग्रॅम प्रती वर्गमीटर याप्रमाणात नर्सरीमध्ये वापर करावा.

सतिश चव्हाण, डॉ. एन. सोमेश्वर (भाकृअनुप- भारतीय तांदूळ संशोधन केंद्र, हैद्राबाद)
प्रियांक म्हात्रे (भाकृअनुप-भारतीय बटाटा संशोधन केंद्र, ऊटी)