30 March 15:17

पिकांवरील संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक- पवार


पिकांवरील संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक- पवार

कृषिकिंग, जळगाव: “शेती व्यवसाय सध्या अडचणींचा होतोय. विदर्भ, खानदेशात गेल्या २-३ वर्षात बोंडअळीच्या संकटाने हाती आलेले सर्व पीक उद्ध्वस्त होत आहे. शेतीतील उत्पादकता कमी होत असून, शेतकरी संकटात आहे. केळीच्या पिकावरही बाहेरील रोग उभा राहतोय. त्यामुळे नगदी पिकांवरील या संकटांबाबत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. पंजाबामध्येही गव्हावर तांबेरा रोगाचे थैमान सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले. जळगाव येथे जैन व्हॅली येथे पद्मश्री. डॉ.आप्पासाहेब पवार कृषी पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.

दिल्लीत एका सत्ताधारी मंत्र्याने मला विचारले, “पवार साहब आप हमेशा पैदा करनेवाले की बात करते हो लेकीन लाखो खानेवाले है...” त्याला पवार म्हणाले, “बराबर है, लेकीन पैदा करनेवाला उद्ध्वस्त हुआ तो खानेवाला क्या खायेगा?” शेतकरी जगला तरच आपण सारे जगू, असे त्याला सूनविल्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. शेतमालाचे भाव वाढले तर महागाई वाढते. खतांच्या किंमती वाढल्या तर महागाई कमी होते, ही राजधानीतील तज्ञ मंडळींची विचारधारा व मानसिकता बदलण्याची गरज आहे. दिल्लीत काहीही उगविले, पिकविले जात नाही. मात्र, दिल्लीकरांना सर्व स्वस्तात हवे असते. शेतीप्रश्नांची, बळीराजाच्या समस्यांची राजधानीतील नागरिकांना जाणीव नसल्याचे पवार यांनी यावेळी नमूद केले.

शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, त्याशिवाय इतर सर्व तत्वज्ञान व्यर्थ आहे. त्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे. चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्यातून शेतीत उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान होतोय, ही आनंदाची बाब आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.