17 August 17:40

पालकमंत्र्यांना ध्वजावंदनापासून रोखणारे देशद्रोहीच?- मुख्यमंत्री


पालकमंत्र्यांना ध्वजावंदनापासून रोखणारे देशद्रोहीच?- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: “सव्वा लाख कोटींची कर्जमाफी केली तर राज्य बंद करावे लागेल, या आंदोलनामागे कोण आहे? केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची आंदोलकांकडून मागणी केली जात आहे. तर आंदोलन करणारे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वज फडकवू देणार नाही, अशी भूमिका घेतात हा देशद्रोह नाही का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता सत्ता गेली तरी चालेल, पण आम्हांला ज्या व्यक्ती देशाचा झेंडा फडकवण्यापासून रोखतील, त्यांना आम्ही सोडणार नाही.” असे म्हणत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची आंदोलने आणि सुकाणू समितीवर सडकून टीका केली आहे. भाजपच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरच्या आरोपांची सुरु असलेली मालिका, या पार्श्वभूमीवरच आज मुंबईत भाजपची राज्य कार्यकरिणीची बैठक पार पडली. त्यात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

“रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकल्या आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातही निवडणुका लढवू,” असे म्हणत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.

त्याचप्रमाणे, केंद्रातून अद्याप कोणताही निरोप आला नसल्याने आपण केंद्रात जाण्याची तूर्तास कोणतीही शक्यता नाही. दिल्लीतून बोलावणे येत नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्रिपदी राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तर, संपूर्ण कर्जमाफी मागणे हे अराजकता निर्माण करण्यासारखे आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, भ्रष्टाचार होऊ नये. यासाठी ऑनलाईन फॉर्म असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.