04 December 11:54

पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा फिका पडतोय!


पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा फिका पडतोय!

कृषिकिंग, पुणे: राज्यात यावर्षी कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. गेल्या वर्षी कांदा उत्पादक फायद्यात राहिल्याने त्याच अपेक्षेने कांदा सलग आठ महिने सांभाळला. मात्र, आज त्याला फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या हंगामात सुमारे राज्यात ९०० कोटी तर नाशिक जिल्ह्यात सरासरी ३०० कोटींचा फटका यामुळे बसणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोळ म्हणजेच खरीपाच्या कांद्याची १५ ते १६ हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी २ हजार ७४८ रुपये भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याची आवक ११ हजार क्विंटल असताना २ हजार ९७५ रुपये भाव मिळाला. यावर्षी १० हजार क्विंटलपेक्षा कमी आवक होऊनही पोळ कांद्याला सरासरी भाव ६०० रुपयांच्या घरात आहे.

नेहमीच आघाडीवर असलेला नाशिक जिल्ह्यातील कांदा यावर्षी निर्यातीत सर्वात मागे असून, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याने निर्यातीत आघाडी घेतली आहे. त्यात पाकिस्तानने गुणवत्ता आणि कमी भावामुळे जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. सरकारने याबाबतीत कोणतेही धोरण न आखल्याने पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा फिका ठरतोय. या सगळ्या परिस्थितीला निर्यात धोरणातील चुका कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय.

कांद्याच्या बाबतीत वाणिज्य मंत्रालयाची धरसोड वृत्ती आणि निर्यात धोरणात दूरदृष्टी नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयाने आता कांदा लागवड आणि उत्पादन यांची सांगड घालून नियंत्रण आणण्याची गरज आहे.टॅग्स