08 September 17:15

पाकिस्तानातही कांदा भडकला...


पाकिस्तानातही कांदा भडकला...

कृषिकिंग, कराची: पाकिस्तानातही कांदा आता ग्राहकांना रडवू लागला असून, कराची येथील किरकोळ कांदा विक्रेत्यांनी बुधवारी कांद्याची किंमत दिवसअखेर ८० रुपये प्रति किलोवरून १०० ते १२० रुपये प्रति किलो पर्यंत वाढवली. (स्रोत- दैनिक डॉन, ७ सप्टेंबर)

“कराची बाजार समितीत मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी कांद्याचा दर सरासरी ११० रुपये प्रतिकिलो इतका राहिला. बुधवारी बाजार समितीत बलूचिस्तानातून १८ ट्रकची आवक झाली होती, तर मंगळवारी ८ ट्रकची आवक नोंदवली गेली होती.” अशी माहिती कराची येथील बाजार समितीचे उपाध्यक्ष आसिफ अहमद यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी लाहोर मध्येही घाऊक बाजारात कांदा ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात होता. त्यात वाढ होऊन तो सध्या ९० ते ९५ किलो प्रति किलो दराने विकला जात आहे. तसेच कांदा अवैधरित्या अफगाणिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाठवला गेल्यामुळे दरात वाढ झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आयातीस परवानगी देणे गरजेचे- अहमद
पाकिस्तानच्या "बलूचिस्तान स्टॉक कमोडिटीचे" कांदा व्यापाराचे समभाग जवळजवळ संपले असल्याने आणि सिंध प्रांतातील कांद्याचे नवीन उत्पादन ऑक्टोबरच्या शेवटी बाजारात येणार असल्याने पाकिस्तानला सध्या कांद्याची आयात आणखी वाढविणे हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे सरकारने कांदा आयात करण्यास लवकर परवानगी देणे गरजेचे आहे.” असेही आसिफ अहमद यांनी सांगितले आहे.

कराची येथील फलाही अंजुमन घाऊक भाजी मार्केट सुपर हाईवेचे अध्यक्ष हाजी शाहजहान यांनी सांगितले आहे की, “ईदूल आझ्हा (बकरी ईद) च्या पार्श्वभूमीवर मागणीत वाढ झाल्याने आणि गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे कराची येथील बाजारपेठेवर परिणाम होऊन कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. गेल्या वर्षी प्रति ४० किलो वजनाच्या गोणीसाठी ३०० ते ४०० रुपये (१० रुपये प्रति किलो) कांद्याचा दर होता. जो सध्या प्रति ४० किलो वजनाच्या गोणीसाठी २००० हजार रुपयांपर्यंत (प्रति किलो ५० रुपये) पोहचला आहे.” तर चालू महिन्यातील देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी भारताकडून कांदा आयात करावा लागेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

आयातीसाठी भारतावर भीस्त
भारतापाठोपाठ पाकिस्तानात कांद्यात तेजी आली असून सध्या भारतातही कांद्याला चांगला दर मिळत आहे. परंतु, आता दोन्ही देशांच्या प्रादेशिक भूभागाचा विचार करता, पाकिस्तानला वाहतुकीचा खर्च मर्यादित ठेऊन भारताकडून कांदा आयात करणे सोईस्कर ठरणार आहे.

तसेच आता भारत सरकारनेही ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या किमान निर्यात मूल्य वाढीच्या मागणीला नकार दिला असून, आता यापुढेही सरकारने कांदा निर्यात मुल्य लागू न करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा भारतीय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण पाकिस्तानात भारतीय कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य तो दर मिळून दीड वर्षातील कांद्यात झालेला तोटा भरून काढणे शक्य होईल. परंतु, यासाठी सरकारला ग्राहकांची नाराजी पत्करून शेतकऱ्यांना कांद्यातील तेजीचा लाभ मिळवून देण्याची भूमिका घ्यावी लागेल. अशी मानसिकता सध्याच्या सरकारने ठेवली तरच शेतकरी सरकारवर विश्वास ठेवेल.टॅग्स