05 February 10:49

पशुपालकांसाठी औरंगाबादमध्ये कृत्रिम रेतन लॅब सुरु करणार- मुख्यमंत्री


पशुपालकांसाठी औरंगाबादमध्ये कृत्रिम रेतन लॅब सुरु करणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, जालना: शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा उत्तम मार्ग आहे. पशुपालनात विविध जातींचे संवर्धन होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब (प्रयोगशाळा) महत्त्वाची आहे. म्हणून ही लॅब मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय प्रायोगिक तत्वावर गायींचा विमा उतरविण्यात येईल, असेही ते म्हणाले आहे.

जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय स्तरावरील महा-पशुप्रदर्शनाचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेही उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडव्यवसाय निवडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली तेथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. शासनामार्फत पशुपालकांसाठी २४३ कोटी रुपयांची जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. याचा फायदा बहुसंख्य लाभार्थ्यांना झालेला आहे. पशुखाद्याबरोबरच पशुपालकांना कृत्रिम लिंग निर्धारित रेतन लॅब महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहे.