23 August 12:55

पवारांचा शेट्टींना हात; खोतांना टोला


पवारांचा शेट्टींना हात; खोतांना टोला

कृषिकिंग, कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील कलगीतुऱ्यावरून शरद पवार यांनी टायमिंग साधत चांगलाच टोला हाणला आहे. “लोकसभेमध्ये शेट्टी यांचे काम दिसते. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी खोत यांनी काही काम केल्याची मला कल्पना नाही. तसेच, त्यांनी शेतकरी आंदोलनात लाठय़ाकाठय़ा खाल्ल्याची वा मारहाण झाल्यामुळे इस्पितळात दाखल झाल्याची देखील माहिती नाही.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात देशातील व राज्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पवार यांच्या या विधानामुळे कोल्हापूरातील आणि सांगली जिल्ह्यातील राजकारणात राजू शेट्टींशी थेट हातमिळवणी करण्याचे संकेत मिळतात. तर, सदाभाऊंना हाताशी धरून शेट्टींचे आणि राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण मोडीत काढण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना धोबीपछाड देण्याचा पवारांचा इरादा स्पष्ट होतो. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची ही प्रतिक्रीया भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी असेल, हे नक्की.