09 February 08:30

नुकसान टाळण्यासाठी म.प्रदेश सरकारकडून ऑटोमॅटिक हवामान केंद्रांची उभारणी


नुकसान टाळण्यासाठी म.प्रदेश सरकारकडून ऑटोमॅटिक हवामान केंद्रांची उभारणी

कृषिकिंग, भोपाळ(मध्यप्रदेश): शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाच्या अंदाजासंदर्भात माहिती न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सहन करावे लागते. मात्र हवामान बदल आणि अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून मध्यप्रदेश सरकार राज्यातील ग्रामीण भागात ऑटोमॅटिक हवामान केंद्रांची उभारणी करत आहे.

“ऑटोमॅटिक हवामान केंद्रांची उभारणी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही १० तहसिलची निवड केली आहे. त्यादृष्टीने काम सुरु असून, यापुढे राज्यातील अन्य तहसिलमध्येही या केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.” अशी माहिती मध्यप्रदेश सरकारच्या कृषी विभागातील या योजनेसाठीचे प्रमुख प्रकल्प अधिकारी बी.एम.सहारे यांनी दिली आहे.

ऑटोमॅटिक हवामान केंद्रांच्या माध्यमातून यापुढे हवामानाचा अंदाज ऑनलाईन मिळवला जाणार असून, यामुळे पावसाचा अंदाज, मातीचे प्रकार, वातावरणातील ओलावा ही आणि अनेक प्रकारची महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना समजू शकणार आहे. त्यामुळे ते हवामानाच्या चक्रानुसार पिके घेऊ शकणार आहे. यासाठी मध्यप्रदेश सरकारला ३० कोटींचा खर्च येणार आहे. तसेच या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रांची मदत घेऊन एकत्रितपणे काम केले जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी केले जाऊ शकते. असेही सहारे यांनी सांगितले आहे.

भारतीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हवामान बदलाच्या फटक्यामुळे देशातील कृषी क्षेत्राचे प्रतिवर्षी १० अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात ६५ हजार कोटींची नुकसान होते.