25 January 18:42

निषेध म्हणून शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटला; मात्र फुकट्यांची एकच झुंबड


निषेध म्हणून शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटला; मात्र फुकट्यांची एकच झुंबड

कृषिकिंग, जळगाव: कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदा वाटून अभिनव आंदोलन केलं. एकीकडे शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं. तर दुसरीकडे फुकट्या लोकांची झुंबड असं विदारक दृश्य यावेळी पाहण्यास मिळालं. लोक अक्षरश: पिशव्या आणि दुचाकीच्या डिक्कीत कांदा भरून नेत होते.

कांद्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्चही मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा पिकाला हमीभाव मिळावा. यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टर भरून आणलेल्या कांद्याचं मोफत वाटप करुन या शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केलं.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत मिळावी. कांद्याला अनुदान रक्कम वाढवून मिळावी. कडधान्य, फळपिकं आणि कापूस यांना योग्य भाव द्यावा, कांदा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव घोषित करावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.टॅग्स