08 January 12:45

निर्यातक्षम द्राक्षांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता


निर्यातक्षम द्राक्षांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

कृषिकिंग, नाशिक: ‘द्राक्ष पंढरी’ आणि ‘वाईन कॅपिटल’ अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात यावर्षी कधी नव्हे इतकी निर्यातक्षम द्राक्षांची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

ओखी वादळामुळे निर्यातक्षम द्राक्ष शेतीला फटका बसला असून, द्राक्ष उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. दरवर्षी कृषी विभागाकडे निर्यातक्षम द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांची नोंदणी केली जाते.

यावर्षीही नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाला ६० हजार द्राक्ष बागांचे लक्षांक प्राप्त झालेले होते. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यासाठी ३० डिसेंबर २०१७ ही अखेरची मुदत देण्यात आली होती. मात्र अंतिम मुदतीपर्यंत नाशिक जिल्ह्यातून अवघ्या १६ हजार ३८० इतक्याच निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी झालेली आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक १३ तालुक्यांतून ३४ हजार ११० द्राक्ष बागांची नोंदणी झाली होती. तर ८५९६ कंटेनर्समधून १ लाख ३१ हजार ९८० मेट्रिक टन द्राक्षे निर्यात झाली होती. कृषी आयुक्तालयाने नाशिक जिल्ह्याला निर्यातक्षम द्राक्ष बागा नोंदणीचे दिलेल्या लक्षांकापैकी अवघे २७.३० टक्के इतके लक्षांक साध्य झालेले आहे. त्यामुळे यावर्षी नाशिक जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे.टॅग्स