13 July 15:11

नाहीतर... आयएमडीच्या कार्यालयाला कुलूप लावणार


नाहीतर... आयएमडीच्या कार्यालयाला कुलूप लावणार

कृषिकिंग, पुणे: हवामान खात्याने अंदाज वर्तवल्या प्रमाणे रविवारीपर्यंत पाऊस पडला नाही तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) कार्यालयाला सोमवारी कुलूप लावणार असल्याचा इशारा महाराष्ट्रातील आघाडीची शेतकरी संघटना असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

आयएमडीने पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही मागील पंधरवडा हा राज्यात कोरडाच राहिला. त्यामुळे या काळात पेरणी केलेल्या शेतक-यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही कमी पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, डाळी आणि ज्वारीची पीके करपू लागले आहेत. शेतकरी होणाऱ्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त करत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे यांनी सांगितले आहे

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आयएमडीने वर्तविलेल्या अंदाजामुळे मोठ्या आर्थिक नुकसानास सानोरे जावे लागले आहे. मुबई-भिवंडी परिसरात होणाऱ्या पावसावर अंदाज वर्तवणाऱ्या आयएमडीच्या अयशस्वीतेमुळे शेतकरी आपल्या नियोजनात अयशस्वी ठरले आहे. जर आयएमडी अचूकपणे अंदाज देऊ शकत नाही, तर अशा पांढऱ्या हत्तींना पोसण्याऐवजी हा विभाग आम्ही बंद करतो, असा इशारा पांडे यांनी दिला आहे.