23 January 10:32

नाशिकमधून युरोपात ७१ कोटींची द्राक्ष निर्यात


नाशिकमधून युरोपात ७१ कोटींची द्राक्ष निर्यात

कृषिकिंग, नाशिक: द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील बागायतदारांना यावर्षी ‘अच्छे दिन’ आले आहेत. यावर्षी तब्बल ७०.७२ कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे. ५०० हून अधिक कंटेनर युरोप आणि रशियात पोहोचले आहेत.

“महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून २७० कंटेनरच्या माध्यमातून ३२४० टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. तर रशियात ३५० कंटेनरच्या माध्यमातून ८८४० टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. अशी एकूण ५२० कंटेनरच्या माध्यमातून युरोप आणि रशियात ७०.७२ कोटी रुपयांची द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे.” अशी माहिती संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी दिली आहे.

मागील वर्षीच्या द्राक्ष हंगामात इंग्लंड, युरोप आणि रशिया या तीन प्रमुख देशांसह अन्य देशांमध्ये १८२ कंटेनर निर्यात झाली होती. मागील वर्षी द्राक्षांचे उत्पादनही चांगले होते. मात्र द्राक्ष उशिराने युरोपात पोहोचले. त्याचवेळी त्यांचा आकारही लहान होता व साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चांगला भाव मिळाला नव्हता. यंदा मात्र पीक वेळेत व चांगले आल्याने तब्बल ८० हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. यासोबतच निर्यातही तीन पट वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा ४० ते ४५ हजार एकरवर जवळपास ३४ हजार भूखंडावर द्राक्षांच्या बागा फुलल्या आहेत.

यावर्षी बागायतदारांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक भाव मिळाल्याने दिलासा आहे. परंतु, नाशिकच्या द्राक्षांना जागतिक पातळीवर चिलीच्या द्राक्षांची स्पर्धा आहे. त्यामुळे उत्पादकांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.