14 September 16:23

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी


नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सात बड्या कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. व्यापाऱ्यांची कार्यालये, निवासस्थान व कांद्याची खळे येथे सकाळी पावणेसात वाजताच आयकर विभागाच्या नाशिकच्या अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत.

कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमधील दोन, चांदवडमधील एक, सटाणा येथील एक बडा व्यापारी, पिंपळगाव बसवंत येथील एक कांदा निर्यातदार, उमराणे येथील एक व येवला येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी घातल्या आहे.

या व्यापाऱ्यांच्या गेल्या महिनाभरातील कांद्याच्या खरेदी विक्री व्यवहारांची तपासणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. कार्यालयातील सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. व्यापाऱ्यांच्या निवास्थानीही अधिकारी सर्व कागदपत्रे शोधत आहेत. व्यापाऱ्यांची कांद्याची खळेही सील करण्यात आली असून तेथे कांदा साठवणुकीची माहिती घेतली जात आहे. कांद्याची खरेदी केल्यानंतर व्यापारी तो माल खळ्यावर नेतात, तेथून कांदा निवडून तो परराज्यात पाठविण्यात येतो.

सटाणा येथील एक व्यापारीही गेल्या काही वर्षात मोठी उलाढाल करणारा व्यावसायिक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मालेगाव तालुक्यातील उमराणे ही कृषी उत्पन्न बाजार समितीही कांद्याच्या मोठ्या उलाढालीसाठी ओळखली जाते. येवला येथेही काही व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करतात. गेल्या महिन्यात घाऊक बाजारपेठेत कांदा २८०० रुपये क्विंटल झाला. मात्र त्यानंतर भावात घसरण होत आहे. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला क्विंटलमागे १२०० ते १५०० रुपये भाव आहे.

जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या निषेधार्थ काही व्यापाऱ्यांनी आज लिलावात सहभाग घेतला नाही. पुढील दिशा ठरविण्याकरीता सध्या तातडीची बैठक सुरू असून, बाजार समितीमध्ये लिलाव कामकाज ठप्प झाले आहे. बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, सचिव बी.वाय.होळकर व सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे व्यापारी यांचेबरोबर विचार विनीमय करण्याकरिता कांदा लिलावात दाखल झाले आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये आज आतापर्यंत ३०० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली असल्याची मिळत आहे.टॅग्स