23 February 10:51

नाशिक व कोकणातील ओखी नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी २ लाख रु.वितरीत- पाटील


नाशिक व कोकणातील ओखी नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी २ लाख रु.वितरीत- पाटील

कृषिकिंग, मुंबई: राज्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे शेती व फळपिकांचे तसेच कोकण विभागात मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले होते.त्याअनुषंगाने नाशिक व कोकण विभागातील ८ हजार ४५ नुकसानग्रस्तांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून, यासंदर्भातील निधीचे वितरण नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना करण्यात आले आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या दोन्ही विभागातील नुकसानग्रस्तांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. निधी नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात थेट जमा करावा. त्याचबरोबर या मदतीच्या रकमेमधून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. नाशिक विभागामध्ये ओखी चक्रीवादळामुळे १५२३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यासाठी २ कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांचा मदत निधी नाशिक विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. तर कोकण विभागात ६ हजार ५२५ नुकसानग्रस्तांसाठी ३ कोटी ६५ लाख ६ हजार रुपयांचा निधी कोकण विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्रासाठी ६८०० रुपये प्रति हेक्टर, बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांसाठी अर्थात फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे. शेती व फळपिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे.