19 December 12:15

नाशिक जिल्ह्यातून १५०० टन द्राक्ष निर्यात


नाशिक जिल्ह्यातून १५०० टन द्राक्ष निर्यात

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत १५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. या हंगामात १३६० टन द्राक्ष रशिया, ६० टन मलेशिया आणि ८० टन द्राक्ष हे श्रीलंका या देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहेत. डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यापासून द्राक्ष निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी एकट्या नाशिक जिल्ह्यांतून ९० टक्के द्राक्ष निर्यात केले जातात. मागील वर्षी २०१६-१७ च्या वार्षिक हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून १ लाख ३१ हजार टन द्राक्ष निर्यातची विक्रमी नोंद झाली होती. कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३.५ लाख एकर एकरमध्ये द्राक्षाची लागवड झाली असून, त्यापैकी दोन लाख एकर एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे.

नाशिक जिल्ह्यातून युरोपसाठी निर्यातक्षम द्राक्षांची नोंदणी ४० हजार ११० एकर इतकी झाली आहे. सुमारे २५,०५७ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. परंतु, निर्यातक्षम द्राक्षांसाठी रशिया, चीन, इंडोनेशिया, अरब राष्ट्रासाठी नियम खूप कडक केले आहेत. हे नियम जर शिथिल केले तर भारतीय द्राक्ष निर्यातीत भरघोस वाढ होऊ शकते,” असे द्राक्ष निर्यातदार व्यापारी मधुकरराव क्षीरसागर यांनी सांगितले आहे.