10 January 10:33

नामपुरात कांदा ५० पैसे किलो; शेतकरी संतप्त


नामपुरात कांदा ५० पैसे किलो; शेतकरी संतप्त

कृषिकिंग, नाशिक: चारआणे, आठआणे चलनातून बाद झालेले असले तरी येथील बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याला व्यापाऱ्यांनी आठ आणे प्रतिकिलो असा भाव दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मालेगाव-ताहराबाद रस्त्यालगत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांदा ओतून काल (बुधवार) सायंकाळी पाच वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलन काळात कांद्याचे लिलाव बंद होते. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश गुरव यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून बाजार समिती प्रशासनाला शेतकऱ्यांना सरासरी भाव देण्याचे आदेश दिले. पोलिस प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

कांद्याच्या लिलावाला सुरवात झाल्यानंतर साक्री तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचा कांदा खराब असल्याच्या कारणास्तव कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव करण्याचे नाकारले. त्यानंतर शेवाळी (ता. साक्री) येथील कांदा उत्पादक संदीप साळुंखे यांच्या लाल कांद्याला ५५ रुपये प्रति क्विंटल असा भाव पुकारण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा व्यापाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला. संतप्त झालेल्या संदीप साळुंखे या शेतकऱ्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या वाहनातील कांदा बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ओतून दिला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून राज्यमार्ग रोखून धरला. रास्ता रोकोमुळे मालेगाव- ताहराबाद रस्त्यालगतची वाहतूक खोळंबली होती.टॅग्स