09 April 17:53

नागपूर विमानतळावर संत्रा फळ विक्री केंद्राचा गडकरींच्या हस्ते शुभारंभ


नागपूर विमानतळावर संत्रा फळ विक्री केंद्राचा गडकरींच्या हस्ते शुभारंभ

कृषिकिंग, नागपूर: नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सहजपणे विमानतळावरच संत्रा उपलब्ध झाल्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी संत्रा आकर्षक संवेष्टनात तसेच उत्तम दर्जाचे संत्रा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महाआॅरेजला गडकरी यांनी यावेळी दिल्या आहेत. नागपूरचा संत्रा अत्यंत उत्तम दर्जाचा असूनही केवळ निर्यात नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाआॅरेजच्या माध्यमातून कारंजा घाडगे येथील संत्रा निर्यात सुविधा केंद्राला मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेमार्फत नागपुरी संत्र्याची निर्यात बांग्लादेश, श्रीलंका, दुबई, कतार आदी देशात केली. दुबईसह इतर देशात संत्र्याला मागणी वाढत आहे. नागपूर येथून दुबईसाठी कार्गोने संत्रा दररोज पाठविण्यात येत असून मागणी वाढत असल्याचे महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे यांनी सांगितलेआहे. महाआॅरेंजच्या माध्यमातून हवाई मार्गाने नागपूर विमानतळावरुन बहरीन, कतार, दुबई इत्यादी देशात संत्रा पाठविण्यात आला असून तेथून पुन्हा मागणी आलेली आहे. असेही श्रीधर ठाकरे म्हणाले.