06 February 07:00

द्राक्ष सल्ला: वातावरण बदलानुसार भुरी नियंत्रणाकडे लक्ष द्या..


द्राक्ष सल्ला: वातावरण बदलानुसार भुरी नियंत्रणाकडे लक्ष द्या..

मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात रिमझिम किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. औरंगाबाद विभागात पावसाचे प्रमाण जास्त असू शकेल. पाऊस होणाऱ्या ठिकाणी नेहमीप्रमाणे पहाटेची आर्द्रता वाढेल. २२ ते २४ तारखेनंतर पुन्हा सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचे नेमके प्रमाण आताच सांगणे कठीण आहे. परंतु तमिळनाडूच्या काही भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे त्याचे परिणाम काही दिवसांत द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण करू शकतात.

वातावरणामध्ये आर्द्रता जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे भुरीच्या जैविक नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. ट्रायकोडर्मा, अॅम्पिलोमायसिस हे दोन्ही बुरशीजन्य घटक पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरल्यास जास्त आर्द्रतेमध्ये चांगले काम करतात. तसेच सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये बॅसिलस सबटिलीस दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात हा जिवाणूसुद्धा जास्त चांगले काम करू शकेल. शून्य रेसिड्यूच्या संदर्भात वेगवेगळ्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या वापराने मिळालेल्या भुरीच्या नियंत्रणापेक्षा फक्त सल्फर व जैविक नियंत्रक घटक वापरलेल्या वेलीमध्ये जास्त चांगले भुरीचे नियंत्रण मिळेल.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82