03 November 11:16

द्राक्ष बागांसाठी पाच नवी बुरशीनाशके


द्राक्ष बागांसाठी पाच नवी बुरशीनाशके

कृषिकिंग, पुणे: “द्राक्षबागांच्या विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांच्या संरक्षणासाठी लेबल क्लेम मिळालेल्या सूचित रसायनांच्या वापरात यंदा पाच नव्या बुरशीनाशकांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या हंगामात राज्यात निर्यातक्षम बागांमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अंदाजे दोन हजार ९० कोटी रुपयांची उलाढाल केली होती. निर्यातक्षम बागांमध्ये अधिकृत सूचीमधील रसायनांचा योग्य वापर केल्यामुळे एकूण निर्यात २ लाख ३२ टनांची झाली. त्यापैकी १ लाख ३६ हजार टन द्राक्षे युरोपात निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामासाठी पाच नवी संयुक्त बुरशीनाशके शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत,” अशी माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे (एनआरसी) संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी दिली आहे.

डाऊनी नियंत्रणासाठी अॅझोक्स्ट्राॅबिन ८.३%+ मॅन्कोझेब ६६.७% डब्ल्यूजी (पीएचआय ६६), कॉपर सल्फेट ४७.१५%+ मॅन्कोझेब ३०% डब्ल्यूडीजी (पीएचआय ६६) , डायमिथोमॉर्फ १२ %+पायरॅक्लोस्ट्राॅबीन ६.७ % डब्ल्यूजी (पीएचआय ५५), भुरी नियंत्रणासाठी बॉस्कॅलिड २५.२ %+ पायरॅक्लोस्ट्राॅबीन १२.८ % डब्ल्यूजी (पीएचआय ५५), तर करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १२ %+ मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी (पीएचआय ६६) ही कीटकनाशके सूचीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे.

“गेल्या हंगामात ३८ हजार बागांची झालेली नोंदणी यंदा ५० हजाराच्या पुढे जाण्याची आशा आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत निर्यातक्षम बागांची नोंदणी ५० रुपयांत होत असून त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह १०० रुपयांत शेतकऱ्यांना बागांची नोंदणी करता येईल. यंदा उशिराच्या पावसामुळे राज्याच्या काही भागांत द्राक्षबागांना अडचणी आल्या आहेत. मात्र, छाटण्या यंदा वेळत असून केवळ २० टक्के छाटण्या शिल्लक असण्याची शक्यता आहे. अन्यथा आतापर्यंत ५० टक्के छाटण्या बाकी असतात. छाटण्या वेळेत होत असल्यामुळे बाजारात एकदम माल येण्याची समस्या कमी राहण्याची शक्यता वाटते,” असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले आहे.टॅग्स