28 August 12:45

द्राक्ष पिकाचे मार्केटिंग करणे आवश्यक- शरद पवार


द्राक्ष पिकाचे मार्केटिंग करणे आवश्यक- शरद पवार

कृषिकिंग, पुणे: "जगातील मार्केटिंगचे केंद्र म्हणून नेदरलॅण्ड ओळख असून आपण पाठवलेल्या द्राक्षांचा सर्वाधिक माल नेदरलॅण्डला जातो. त्यामुळे स्थानिक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व बाजूने या द्राक्ष पिकाचे मार्केटिंग करणे आवश्यक आहे," असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५७ व्या वार्षिक मेळाव्यात पवार बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर, सोपान कांचन या वेळी उपस्थित होते.

“फलोत्पादनात राज्याला अग्रेसर करण्यासाठी फळबागांवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासाठी गरज भासल्यास केंद्र आणि राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करणे आवश्यक आहे. देशात प्रत्येक राज्याच्या भौगोलिक स्थितीनुसार वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन होते. त्यामुळे पश्चिम बंगालला भात लावणे फायदेशीर असते. परंतु, महाराष्ट्रात परिस्थिती निराळी असून निसर्गाचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याने किती माल पिकवला यापेक्षा शेतमालात विविधता आणणे महत्वाचे आहे." असेही पवार यांनी सांगितले आहे. तसेच, फळांची निर्यात ही रेल्वेतून करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

तर गडकरी म्हणाले, “द्राक्ष उत्पादनात राज्याचे काम चांगले असून या पिकामुळे चौदा हजार कोटींची उलाढाल होत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाइनला जगाच्या बाजारात मोठी किंमत आहे. सध्या केंद्रीय वाहतूक विभागाकडून द्राक्ष, सफरचंद, संत्री यांची विमानाद्वारे वाहतूक केली जाते. आगामी काळात ही वाहतूक रेल्वेने करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.”टॅग्स