10 March 08:30

द्राक्ष निर्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढणार


द्राक्ष निर्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढणार

कृषिकिंग, नाशिक: द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ, विदर्भ-मराठवाड्यातील गारपीट व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प्रतिकूल परिस्थितीवर नाशिकच्या शेतकऱ्यांनी कठीण परिश्रम आणि नियोजनाच्या जोरावर मात केली असून, या हंगामात गेल्या वर्षापेक्षा १० ते १५ टक्के निर्यात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागील वर्षी द्राक्षांचे उत्पादन वाढ होऊनही युरोपात चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत उशिरा दाखल झालेल्या नाशिकच्या द्राक्षांचा लहान आकार व साखरेचे कमी प्रमाण यामुळे द्राक्षांना अपेक्षित भाव मिळाला नाही. परंतु, यावर्षी नाशिक जिल्ह्यातून हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्षबागायतदारांनी निर्यातीवर अधिक भर देत इंग्लंड, युरोप रशियासह अन्य देशांमध्ये द्राक्षांची निर्यात केली. त्यामुळे नंतरच्या काळात द्राक्षांच्या बाजारपेठेत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी त्याचा फटका द्राक्षनिर्यातीला बसला नाही. बहुतांश मालाची निर्यात अंतिम टप्प्यात आली असताना आता देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात द्राक्षांचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले असून, मार्चअखेर द्राक्षांचे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना ६१ ते ८० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत ३० रुपयांपासून ५०-५५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. यात जसजसे बागांचे प्रमाण कमी होईल व तापमानात वाढ होईल त्याप्रमाणे वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांचे दरही वाढतील, असा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

"ओखी वादळाचा फटका, त्यानंतरच्या विदर्भ-मराठवाड्यातील गारपीटीच्या पार्श्वभूमीवर तसेच ढगाळ वातावरणामुळे यावर्षी द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागली. शेतकऱ्यांनी द्राक्षबागा डोळ्यात तेल घालून जपल्या. त्यामुळेच नाशिकच्या द्राक्षांची मुख्य बाजारपेठ असलेल्या युरोप व इंग्लंडमध्ये यावर्षी नियोजित वेळेत द्राक्षांची निर्यात करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे." अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी दिली आहे.टॅग्स