09 June 15:57

दोन दिवसांत मान्सून राज्यभरात


दोन दिवसांत मान्सून राज्यभरात

कृषिकिंग, पुणे: राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात राज्यभर मान्सून बरसण्याची शक्यता आहे. कोकणातील पेरणीची कामे प्रगतीपथावर आहे. उर्वरित महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे संपवावीत. अशी माहिती आयएमडीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.एन चटोपाध्याय यांनी कृषिकिंगला दिली आहे.

नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा जरी मॉंन्सून गोव्यात दाखल झाला असला तरी तीन दिवस जोरदार कोसळलेल्या मान्सूनपूर्व सरींनी गोव्यात पावसाळी वातावरण अगोदरच तयार झाले होते. बुधवारपर्यंत होन्नावर आणि दक्षिण कारवारपर्यंत पोहोचलेला मान्सून गतिमान झाल्यामुळे गुरुवारी तो गोव्यात आणि सिंधुदुर्गच्या काही भागांतही पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली.

दिवसभरात गोव्यात पेडणे १२० मिमी , वसई १०० मिमी , पणजी ९० मिमी, अलिबाग-मुरुड ७० मिमी, म्हसळा-वेंगुर्ला ६० मिमी, डहाणू-हर्ण-मार्मागोवा ५० मिमी तर देवगड-जव्हार-माथेरान-फोंडा-उरण येथे ४० मि.मी पावसाची नोंद झाली. याशिवाय मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.