31 May 14:06

देशात वाढले कांद्याचे उत्पादन, मंदीचा फटका आणि शासकीय धोरण


देशात वाढले कांद्याचे उत्पादन, मंदीचा फटका आणि शासकीय धोरण

कृषिकिंग मार्केट रिसर्च या वर्षी देशात कांदा आणि बटाटा पिकाचे उत्पादन वाढले आहे. मंगळवारी कृषिविभागाने २रे पूर्वानुमान आकडेवारी जाहीर करताना ही माहिती दिली.

या वर्षी देशात २०१५.६४ लक्ष टन कांदा उत्पादन होणार असून आजवरील हे सर्वोच्च उत्पादन राहील. कृषिविभागाने पहिल्या पुर्वानुमानात १९७ लक्ष कांदा उत्पादनाची आकडेवारी दिली होती. त्यात तब्बल १७.३६ लक्ष टनांची वाढ झाली. मागील वर्षी कांद्याचे उत्पादन कृषिविभाग आकडेवारीनुसार २०९.३१ लक्ष टन नोंदविले गेले होते. कृषिकिंग मार्केटरिसर्चने काही व्यापारी आणि निर्यातदार यांना याबाबत विचारले असता वास्तविक आकडेवारीत किमान १० ते २० लक्ष टनांनी जास्त असावी असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

वाशी मार्केट मधील कांदा आडते आणि निर्यातदार संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र शेळके यांनी कृषिकिंग मार्केट रिसर्चला दिलेल्या माहितीनुसार सध्या वाशी मार्केटला १२५-१५० गाडी कांद्याची आवक रोज होत आहे. मार्च महिन्यापर्यंत ३२ लक्ष टन कांदा निर्यात झाला आहे. सध्याचे कांदा आणि इतर भाजीपाल्यांचे पडलेले दर हा शासकीय धोरणाचा फटका असून मागील वर्षभर हीच परिस्थिती आहे. सध्या निर्यात देखील मंदावली आहे.

कृषिकिंग मार्केट रिसर्च टीम:
कांद्यासाठी देशाची साधारणपणे वार्षिक मागणी १८५ लक्ष टन एवढी आहे. म्हणजे साधारणपणे रोज ५० हजार टन, आणि महिन्याकाठी १५ लक्ष टन कांदा देशास लागतो. त्यामुळे मागणीच्या तुलनेत जर ३० लक्ष टन अधिक उत्पादन झाले तर २ महिन्याचा अतिरिक्त कांदा साठा तयार होतो. मात्र तितकाच किंबहुना जास्त कांदा निर्यात झाला असल्याने कांद्यामध्ये मंदी असण्याचे कारण नाही. तरीही जर वर्षभरापासून भाव पडलेले असतील तर यामध्ये शासकीय धोरणाचा प्रतिकूल परिणाम असण्याची शक्यता आहे. कारण फंडामेंटली कांदा अतिरिक्त आहे असे चित्र सध्या तरी नाही. शासकीय आकडेवारी आणि वास्तविक उत्पादन यातील तफावत देखील मोठी असू शकेल.