07 August 16:10

देशभरात सरासरी २ टक्के अधिक पाऊस; तर दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस


देशभरात सरासरी २ टक्के अधिक पाऊस; तर दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस

कृषिकिंग, नवी दिल्ली: “देशातील बहुतेक भागांत चांगला पाऊस झाला असून, सामान्य पर्जन्यामानापेक्षा देशभरात आतापर्यंत २ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, असे असले तरी दक्षिण भारतात वर्तलेल्या अंदाजापेक्षा कमी पावसाची नोंद झाली. तसेच आता पुढील काही दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर-पूर्वी राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.” असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले आहे.

“आयएमडीने यावर्षीच्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवताना सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्या अंदाजाचा विचार करता, यावर्षी आतापर्यंत सरासरी ९९ टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात १.१ टक्के पाऊस कमी राहिला होता, जुलै महिन्यात २ ते ३ टक्के पर्जन्यमान अधिक राहिले आहे. तर आता ऑगस्ट महिन्यात सामान्यपेक्षा २ ते ३ टक्क्यांनी कमी पर्जन्यमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे.” असेही भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

संपूर्ण देशभरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ६.५ टक्के अधिक पर्जन्यमानासह, सरासरी ४०५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर-भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पर्जन्यमानासह, सरासरी २४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य-भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पर्जन्यमानासह, सरासरी ४३४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

याउलट दक्षिण-भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पर्जन्यमानासह, सरासरी ४३४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा ५ टक्के कमी पर्जन्यमानासह, सरासरी ७२१.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.टॅग्स