13 December 14:53

देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; वाचा काय आहे बातमी...


देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; वाचा काय आहे बातमी...

कृषिकिंग, मुंबई: निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात फडणवीसांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही. या दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी हेतूपुरस्पर दडवल्यानं उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. सतीश उके यांनी यासंदर्भांत याचिका दाखल केली आहे.

यापूर्वी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलासा दिला होता. मात्र, आता याचिकाकर्त्ये सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाणावर मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय की, "२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात याच याचिकाकर्त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. याच याचिकाकर्त्यांविरुद्ध मा. उच्च न्यायालयाने न्यायालय अवमाननेची कारवाईसुद्धा प्रारंभ केली आणि सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असेही विचारले होते. आज मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही या संदर्भातील आहे. तेथे त्यावर योग्य ते उत्तर सादर केले जाईल' असं म्हटलं आहे.