17 July 15:16

दूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला; गडकरी-पवार बैठकीत तोडगा निघणार?


दूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला; गडकरी-पवार बैठकीत तोडगा निघणार?

कृषिकिंग, नवी दिल्ली: महाराष्ट्रात पेटलेला दूधाचा प्रश्न आता राजधानी दिल्लीत पोहोचला असून, या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होणार आहे. या दोन नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत दूधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, तो दौरा रद्द करून ते दिल्लीत जाणार असून, सायंकाळी गडकरी-पवार भेट होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून महाराष्ट्रात दूधाच्या प्रश्नावर आंदोलन पेटले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबईचे दूध तोडण्याचा निर्धार केला आहे. सध्या तीन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा मुंबईत असून, हे आंदोलन आणखी काही दिवस चिघळले तर मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होणार आहे. रविवारी मध्यरात्री पंढरीच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला सुरुवात केली होती. दुधाला लीटर मागे ५ रुपये भाव ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. ३ रुपये दरवाढ हा निर्णय दूध पावडर तयार करणाऱ्यांनी केला असून, हा निर्णय केवळ दूध संकलन करणाऱ्यांचा आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.