15 June 11:49

दूध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये अनुदानाची केंद्राकडे मागणी- खोत


दूध पावडर निर्यातीसाठी ५० रुपये अनुदानाची केंद्राकडे मागणी- खोत

कृषिकिंग, पुणे: "राज्यातील अतिरिक्त दूध संकटामुळे घटलेल्या दर पूर्वपदावर आणण्यासाठी दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या प्रश्‍नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे." अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी दिली आहे.

खोत यांनी मंत्री गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की ‘महाराष्ट्रात २ कोटी लिटरपेक्षा अधिक दूध संकलन होत असून, हे दूध अतिरिक्त झाले आहे. परिणामी दुधाचे दर घटले आहेत. तसेच दूध पावडरचे दर राष्‍ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाले आहेत. यामुळे दुधावर प्रक्रिया करून पावडर बनविणारे संघदेखील तोट्यात आले आहेत. दुधावर जास्तीत जास्त प्रक्रिया होऊन पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान दिल्यास पावडरचा साठादेखील कमी होईल आणि दूध संघांना अधिकच्या दुधावर प्रक्रिया करणे शक्य होईल.’

जागतिक बाजारात दूध पावडरचे दर पडलेले आहेत हे खरे आहे. ही परिस्थिती लगेच पूर्ववत होणार नाही. राज्य सरकार आजही आरेच्या माध्यमातून २७ रुपये दूधदर देत आहे. मात्र, आमची संकलन केंद्रे कमी आहेत. दुधाचे धोरण सध्या नाही. ते बनविण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. उसाप्रमाणे ७०-३० चा कायदा केल्यानंतर यावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. अशी माहितीही जानकर यांनी यावेळी दिली आहे.

राज्य सरकारची ७८ हजार टन पावडर पडून आहे. यामध्ये खासगी दूध संघाची पावडर वेगळी आहे. जागतिक बाजारात दूध पावडरचे दर ४६ टक्के घसरले आहेत. त्यामुळे गरोदर माता, आश्रमशाळा, शालेय पोषण आहार, आरोग्य केंद्रामधून अंडी, दूध दिल्यास पावडरचा मोठा प्रश्न मार्गी लागेल. येणाऱ्या ‘कॅबिनेट’मध्ये निर्णय होणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.