10 July 12:54

दूध दराच्या तिढ्यावर दोन दिवसांत निर्णय- मुख्यमंत्री


दूध दराच्या तिढ्यावर दोन दिवसांत निर्णय- मुख्यमंत्री

कृषिकिंग, नागपूर: राज्यात दूधदराच्या तिढ्यावर येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. तसेच, या संदर्भातील लक्षवेधी राखून ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी ही लक्षवेधी मांडली होती. यावेळी भोईर म्हणाले की राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने दूध दरासाठी मागील महिन्यात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. खासगी दूध संघांवर सरकारचे नियंत्रण नाही. राज्य सरकारने तातडीने कायदा करून खासगी संघांवर अंकुश निर्माण करावा. तसेच गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे ५ रुपये भुकटी अनुदान जाहीर करावे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील दूध धंद्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना १७ ते १८ रुपयांच्यावर दर मिळत नाही. राज्यात दूध उत्पादकांची परवड सुरू असताना सरकार तातडीने उपाययोजना करण्यापेक्षा बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहेत. राज्यात दुधाचा महापूर आला आहे. अतिरिक्त दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करताना अनुदानाशिवाय निर्यात होणार नाही. गुजरात सरकारने त्यासाठी दीडशे कोटी रुपये अनुदान दिले आहे. राज्य सरकारनेही अनुदान जाहीर करावे. दुधाचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. जेणेकरून पोषण आहारातील भ्रष्टाचार आणि निकृष्ठ पुरवठा होणार नाही. सरकारने त्या-त्या जिल्ह्यातील दूध संघांवर जबाबदारी सोपवावी. गैरप्रकार घडल्यास संघांना जबाबदार धरावे. फरकाचे ५ ते ७ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी विखे यांनी केली आहे.