25 December 10:53

दूध उत्पादकांचे अनुदानापोटी ३५० कोटी रुपये थकले


दूध उत्पादकांचे अनुदानापोटी ३५० कोटी रुपये थकले

कृषिकिंग, पुणे: शेतकऱ्यांकडून दूध खरेदीसाठी दूध उत्पादक संघांना देण्यात येणारी अनुदानाची थकीत रक्‍कम ३५० कोटी रुपयांवर पोचली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून थकीत अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे राज्यातील दूध व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले असून, दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची चिन्ह आहेत.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी राज्य सरकारने दूध संघाना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून जानेवारीपर्यंत सहा महिने हे अनुदान देण्यात येणार आहे. परंतु, सरकारने पहिल्या टप्प्यात ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या तीन महिन्यांतील ९० दिवसांपैकी केवळ ४० दिवसांच्या अनुदानाची रक्‍कम दिली. उर्वरित ५० दिवसांचे सुमारे दीडशे कोटी रुपये आणि त्यापुढील डिसेंबर अखेर सुमारे दोनशे कोटी असे, सुमारे ३५० कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडे थकीत आहे.

यासंदर्भात राज्य दूध व्यावसायिक संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी थकीत अनुदान लवकरच देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच, दुग्धविकास मंत्र्यांनीही अनुदानाची रक्‍कम लवकरच हस्तांतरित करू, असे सांगितले. मात्र, अद्याप अनुदानाची रक्‍कम मिळालेली नाही. त्यामुळे दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.



टॅग्स