14 December 10:31

दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच सहकारी दूध संघांचे प्रश्नही सोडवू- मुख्यमंत्री


दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच सहकारी दूध संघांचे प्रश्नही सोडवू- मुख्यमंत्री

कृषिकिंग, नागपूर: “दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी सहकारी दूध उत्पादक संघही टिकले पाहिजेत. यादृष्टीने हिवाळी अधिवेशन काळातच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या विषयावरील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सर्वश्री शिंदे, विजय वडेट्टीवार, नसीम खान, अमीत देशमुख, अमीन पटेल, सुनिल केदार आदींनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २७ रू. इतका दर सहकारी दूध संस्थांनी द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. सहकारी दूध संस्थांनी इतका दर देण्यास असमर्थता दर्शविली असून, अनेक सहकारी संस्था सध्या हा दर देत नाहीत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या प्रशासकीय व इतर खर्चावर नियंत्रण न आणता शेतकऱ्याला दुधासाठी मिळणाऱ्या दरावर नियंत्रण आणणे हे अन्यायकारक आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत चांगला दर मिळणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी सहकारी दूध संस्थाही अडचणीत येणार नाही. याबाबत शासन निश्चितच योग्य कार्यवाही करेल,”

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यावेळी म्हणाले की, “सहकारी दूध संघांना सध्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.”

तर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी सांगितले आहे की, “शासकीय, सहकारी व खाजगी दूध क्षेत्रामध्ये एकसूत्रता यावी. तसेच दरवर्षी दुधाचा पुष्टकाळ व दूध भुकटीच्या दरातील चढ-उतारामुळे दुधाच्या भावामध्ये होणाऱ्या तफावतीबाबत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शुगर प्राईज कंट्रोल ॲक्टच्या धर्तीवर ७०:३० या सूत्राप्रमाणे दुधाचे दर शेतकऱ्यास मिळावे. यासाठी कायदा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.”