30 November 11:37

दुष्काळाशी सामना करण्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद- मुख्यमंत्री


दुष्काळाशी सामना करण्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील दुष्काळावरील उपाययोजनांसाठी यापूर्वी ७३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पुरवणी मागण्यांद्वारे २ हजार २६३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशी एकूण ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच याच महिन्यात राज्य शासनाने केंद्र सरकारकडे ७ हजार ५२२ कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

मंगळवारपासून सभागृहात २९३ अन्वये दुष्काळावर चर्चा करण्यात येत होती. त्याला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सज्ज आहे. पिण्यासाठी पाणी, पशूधनासाठी पाणी व चारा, रोजगार हमी योजनेची कामे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दुष्काळग्रस्तांना धान्यपुरवठा आदी सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.

दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी तालुके समाविष्ट करण्याची मागणी असून, त्याबाबत विचार करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.