13 November 10:16

दुष्काळाऐवजी मंदिराच्या नावाचीच चर्चा सुरु- शरद पवार


दुष्काळाऐवजी मंदिराच्या नावाचीच चर्चा सुरु- शरद पवार

कृषिकिंग, मुंबई: शेतकरी वर्गाची दयनीय अवस्था झाली आहे. दुष्काळ परिस्थिती हाताळण्याची कवडीची आस्था आताच्या सरकारमध्ये नाही. दुष्काळाचा एवढा मोठा प्रश्न आहे पण सध्या फक्त मंदिराच्या नावाचीच चर्चा सुरू आहे. मंदिर, मस्जिद वाद घालून समाजात वाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच कुणी तरी आता अयोध्येला जायला निघालंय असा टोलाही पवारांनी उद्धव ठाकरें यांना लगावला आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित शेतकरी हक्क परिषदेत शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुष्काळाची झळ बसू लागल्याने ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर करताना दिसू लागले आहे, सरकार ग्रामीण भागात मदतीचा हात पोहचवू शकत नसल्याने हे होत आहे. असा आरोप पवारांनी केला आहे. बडे उद्योजक कर्ज बुडवतात, हजारो कोटी थकविणारा शेतकरी वर्ग नाही तर उद्योजक-व्यापारी वर्ग आहे, असेही ते म्हणाले आहे.

आज शेती अडचणीत आणि काळ्या आईची सेवा करणारा घटक संकटात आहे. अशा परिस्थितीत जर आपण एकत्र येऊन लढा दिला नाही तर हा घटक पूर्णतः संपेल. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.