19 October 13:53

दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सर्वोतोपरी साथ देऊ- पंतप्रधान


दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सर्वोतोपरी साथ देऊ- पंतप्रधान

कृषिकिंग, शिर्डी(अहमदनगर): "मला माहितीये यावर्षी महाराष्ट्रात कमी पाऊस पडलाय. मात्र, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल." असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिर्डी येथे आज श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याची सांगता पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यातील २० हजार लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे वाटप करण्यात आले.

यावर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकार हिमालयाप्रमाणे राज्य सरकारच्या सरकारच्या मदतीला धावून आले. यावेळीही केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी आशा आहे. असे आवाहन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच व्यासपीठावरून केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले आहे की, "महाराष्ट्रात यावर्षी कमी पाऊस पडला आहे. परंतु, मी तुम्हाला आश्वासन देतो की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्यात येईल. याशिवाय राज्य सरकार जे निर्णय घेईल, त्यास खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार मदत करेल."