21 December 10:27

दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ


दीड लाखावरील कर्जफेडीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

कृषिकिंग, नागपूर: शेतकरी कर्जमाफीअंतर्गत दीड लाख रुपयांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वरचे कर्ज फेडण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.

"दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज एकरकमी फेडल्यास दीड लाखाची कर्जमाफी देण्यात येते. हे वरचे कर्ज फेडण्याची मुदत ३१ डिसेंबर होती. ती आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. तसेच नागरी सहकारी बँकांनी दिलेले पीककर्ज हे माफीच्या कक्षेत आणण्याबाबत माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल. काही बहुभूधारक शेतकरी कर्जमाफीतून सुटले असतील तर त्यांना कर्जमाफी देण्याचाही विचार केला जाईल," अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

आजपर्यंत ६७ लाख पात्र अर्जांपैकी ४७ लाख ८८ हजार ९९५ लाख खात्यांवर पैसे जमा करण्यात आले असून, यापैकी ३४ लाख खाती ओटीएसची, तर १३ लाख ७७ हजार खाती इन्सेटिव्हची आहेत. आतापर्यंत २३ हजार ३०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. मागील वेळेप्रमाणे आम्ही बँकांकडून यादी न मागवता शेतकऱ्यांचे अर्ज आणि बँकांची यादी यांचा मेळ तपासून पैसे वाटप केल्याने थोडा वेळ लागला. ओटीएसचे पैसे बँकांना एकत्र न देता बँका खाती क्लियर करतील तसे पैसे देण्यात येत आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.