22 January 14:16

दिल्लीत मुसळधार पाऊस; विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


दिल्लीत मुसळधार पाऊस; विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: दिल्ली आणि उत्तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आज (मंगळवारी) सकाळी अचानक मुसळधार पाऊस पडला. आधीच थंडीची लाट व धुक्याचा सामना करणाऱ्या दिल्लीत पावसामुळे आणखी अंधार पडला आहे. रात्री उशीरापासून सकाळपर्यंत हा पाऊस सुरूच होता. त्यामुळे, अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला.

त्यात आणखी एक दणका दिल्लीकरांना हवामान विभागाने दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांपर्यंत दिल्लीत असेच वातावरण राहील असा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. त्यामुळे, अनेक भागांत गारपीटची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तीव्र पश्चिमी चक्रावाताच्या स्थितीचा प्रभाव पुढील दोन दिवसांत जम्मू-काश्मीर आणि हिमालयाकडे वाढणार आहे. याशिवाय वायव्य भारतात जमिनीलगत जोरदार वारे वाहणार असून, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवस गारपीट होणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही गुरुवारपासून (ता.२४) गारपिटीचा इशारा देण्यात आला असून, विदर्भासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.