01 February 18:55

दर घसरणीमुळे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतचा कांदा अनुदानास पात्र- सहकारमंत्री


दर घसरणीमुळे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतचा कांदा अनुदानास पात्र- सहकारमंत्री

कृषिकिंग, मुंबई: "कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कांदा अनुदानासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. १५ डिसेंबर नंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे," असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

"राज्यातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये दि. १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०१८ नंतरही कांद्याच्या दराची घसरण कायम राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे," असेही त्यांनी सांगितले आहे.

या योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्ती या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. असेही देशमुख म्हणाले आहे.टॅग्स