31 December 11:00

थंडीमुळे नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकरांवरील द्राक्षबागा संकटात


थंडीमुळे नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकरांवरील द्राक्षबागा संकटात

कृषिकिंग, नाशिक: यावर्षीच्या हंगामात मुबलक द्राक्ष उत्पादनामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अधिक निर्यात होईल. या उत्पादकांच्या आशेवर कडाक्याची थंडी पाणी फेरण्याच्या मार्गावर आहे. दिवसागणिक घटणाऱ्या तापमानाने रविवारी नाशिक जिल्ह्यात पाऱ्याने शून्याची पातळी गाठली. अवघा परिसर गारठल्याने द्राक्षवेली, द्राक्ष घडांचा विकास खुंटला असून परिपक्व मण्यांना तडे जाऊ लागले आहे. याचा परिणाम उत्पादनासह निर्यातीवर होण्याची भीती आहे.

थंडीने मुक्काम ठोकल्याने जिल्ह्य़ातील सुमारे दोन लाख एकरांवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अलीकडच्या काळापर्यंत वातावरण पोषक राहिल्याने द्राक्षांचे मुबलक उत्पादन होण्याचा अंदाज होता. हंगामपूर्व द्राक्षांना किलोला ८० ते १०० रुपये असे दर मिळाल्याची ख़ुशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर होती. मात्र, डिसेंबर अखेर हवामानातील बदल द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम करणारे ठरत आहे.

सध्या द्राक्षमण्यांत साखर उतरणे, त्यांची फुगवण प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी द्राक्ष घड परिपक्व होत असून त्या बागा लवकरच काढणीवर येतील. या सर्व बागांना थंडीचा तडाखा बसत आहे. बागायतदार संघाने उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या शृंखलेतून मिळणाऱ्या अंदाजाच्या आधारे उत्पादक बागा वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. तापमान खाली जाऊ नये म्हणून बागांना पाणी देणे, शेकोटी पेटवून धडपड सुरू आहे. निर्यातीसाठी द्राक्षमण्यांचा आकार १६ मिलीमीटरपेक्षा अधिक असावा लागतो. मण्यांची वाढ खुंटल्याने तो आकार प्राप्त होईल की नाही, याबद्दल धास्ती आहे. द्राक्षमण्यांना तडे गेले, डाग पडल्यास त्याचा रंग, दर्जावर परिणाम होतो.

द्राक्ष निर्यातदार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मागील हंगामात सव्वादोन लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून देशाला दोन हजार कोटींहून अधिक रुपयांचे परकीय चलन मिळाले. या हंगामात अडीच लाख मेट्रिक टनपर्यंत निर्यात होईल, असा संघटनेचा अंदाज आहे. आतापर्यंत सुमारे ३०० कंटेनर द्राक्ष रशिया, बांगलादेशमध्ये पाठविण्यात आले. युरोपीय देशात निर्यात सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचे दरवाजे भारतीय द्राक्षांसाठी प्रथमच खुले झाले आहेत. निर्यातीचा आलेख उंचावण्यास अनुकूल स्थिती असतानाच कडाक्याची थंडी त्यात अडथळे आणणार असल्याचे चित्र आहे.टॅग्स