03 August 10:20

तेजीकडे चाल करणारा कांदा शेतकऱ्याचा तोटा भरून काढणार काय?


तेजीकडे चाल करणारा कांदा शेतकऱ्याचा तोटा भरून काढणार काय?

कृषिकिंग मार्केट रिसर्च: कांदा दीड वर्षांच्या अभूतपूर्व मंदीतून सावरतो आहे. आणि तेजीकडे वाटचाल करू लागलाय. खरीपाचा कांदा अजून बाजारात यायला किमान नोव्हेंबर सरलेला असेल. त्यामुळे अजून काही महिने चांगली तेजी अपेक्षित आहे. मात्र खरीपातील घटलेली लागवड आणि त्यानंतर असणारा कांद्याचा तुटवडा यावर कांद्याची तेजी दीर्घकाळ मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे साठवणुकीत असणारा चांगला कांदा आता शेतकऱ्याचा तोटा भरून देणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

दोन वर्षापूर्वी अपारंपारिक क्षेत्रात झालेली कांदा क्षेत्रात वाढ आणि अपरिपक्व कृषिधोरण यामुळे कांद्याचा पुरवठा देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मागणीच्या तुलनेत जास्त राहिल्याने कांदा दबावात राहिला. मात्र सततच्या दीड वर्षाच्या मंदीमुळे यावर्षी उत्तरेकडील अपारंपारिक क्षेत्रात खरीप कांदा लागवड प्रचंड कमी झाली, शिवाय तुलनेने कापूस आणि डाळींचे क्षेत्राकडे तेथील शेतकरी वळाला असल्याने कांद्याची पुरवठ्याची भीस्त महाराष्ट्रावरच आहे. महाराष्ट्रातही मागील दोन वर्षात घटलेले उसाचे क्षेत्र पुन्हा झपाट्याने वाढले असल्याने, यातील बहुतेक क्षेत्र कांदा लागवडीच्या योग्य असल्याने तिथेही यापुढील काळात कांदा लागवड होणे शक्य नाही. इतर राज्यांची परिस्थिती, कांदा उपलब्धता, निर्यातीची परीस्थीती, उत्पादन आकडेवारी, कांदा बियाण्यांचा घसरलेला खप अशा अनेक अनुषंगाने कृषिकिंग मार्केट रिसर्च टीमने कांद्याच्या भविष्याच्या वाटचालीचा घेतलेला हा वेध.

कांद्याची देशांतर्गत गरज रोजची ५० हजार टन, महिन्याची १५ लाख टन तर वर्षाची १८५ लाख टनच्या आसपास आहे. मागील वर्षात कांद्याचे अतिरिक्त उत्पादन जवळपास मागणीच्या तुलनेत १८ लक्ष टन अधिक झाले आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे यात १० लाख टन अधिक आकडा असू शकतो. जवळपास ३५ लक्ष टन कांदा निर्यात झाला आहे. म्हणजे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत देशांतर्गत साठा जवळपास ७ ते १७ लाख टन कमी आहे हे नक्की (१ महिन्याचा कांदा शॉर्टेज). अजूनही निर्यात चालू राहणार आहे. निर्यात चालू राहणे हे गरजेचे आहेच. त्याशिवाय शेतकऱ्यांचा झालेला तोटा भरून निघणारा नाही. त्यामुळे आगामी काळात सरकार निर्यातीवर बंदी घालण्याचा अथवा किमान निर्यात मूल्य लागू करण्यासारख्या हालचाली करून निर्यातीला अटकाव करण्याचा प्रयत्न करणार का हा मुद्दा कळीचा ठरणार आहे.

याबाबत कृषिकिंगशी बोलताना कृषिमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांनी माहिती दिली आहे की, कांद्याचे पिकचक्र पाहता सदर तेजी संक्रांतीपर्यंत राहू शकेल. राज्यातील खरिपाच्या लागवडीचा आणि सप्टेंबरच्या मध्यात दक्षिणेकडून येणारा कांद्याच्या उपलब्धतेमध्ये ४० ते ५० टक्के घट होण्याची शक्यता आहे. साठवणुकीतील २५ ते ३० लाख टन कांदा हा ऑक्टोबर पर्यंत मागणी पूर्ण करू. मात्र सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत नवीन कांदा पुरवठा बाजारात वाढणार नसल्याने कांद्याचे शॉर्टेज जाणवू लागेल. मध्यप्रदेशकडील कांदा शेतकऱ्यांनी सरकारला विकला आहे. त्यांच्याकडूनही पुरवठा होईल असे चित्र नाही. गुजरातमधील पावसाळी कांदा अतिवृष्टीमुळे नुकसानीत आहे. तसेच तेजी ओळखून शेतकरीदेखील कांदा झटपट विक्री करण्याच्या तयारीत नाही. नवीन लेट खरीप लागवड केली तरी तो कांदा बाजारात यायला बराच अवकाश आहे.

नवी मुंबई कांदा बटाटा निर्यात संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार तेजी टप्प्या टप्प्याने होत जाईल. नवीन लागवडीत ४० ते ५० टक्के घट समजते आहे. फलटण, बारामती, पुरंदर, संगमनेर अशा कमी पावसाच्या भागात पावसाळी कांद्याची खास करून लागवड होते. मार्केट मधून सध्या १२ ते १४ रु. ने निर्यातीसाठीच्या मालाची वाशी मार्केट मधून खरेदी होते आहे. सरकारी धोरणे कांद्याच्या मंदीस कारणीभूत ठरली आहेत. नियमनमुक्तीमुळे देखील कांद्याचे ठोक दर २ ते ३ रु. कमी राहिले. मागील ५ महिन्यात जागतिक बाजारपेठेत भारताच्या पुरवठ्यावरच कांदा ग्राहकांची भीस्त होती. नियमनमुक्तीमुळे निर्यातीतही तेजी करता आली नाही. मध्यप्रदेश सरकारने ८ रु. ने खरेदी केलेला कांदा देखील सव्वा दोन रु. ने निविदा काढून विकला, यात फायदा नेमकी कुणाचा व कसा झाला हेही कळायला मार्ग नाही.

गुजरात मधील जालाराम ग्रुपच्या अमूल कांदा प्रक्रिया उद्योगाचे संचालक मिलाफ खोडीफड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये तेजी होत आहे. कांदा पावडर, फ्लेक्स प्रक्रिया उद्योग एप्रिल पासून बंद आहेत. तसेच या उद्योगांना पुरवठा करणाऱ्या क्षेत्रात, भावनगरमधून देखील रबीची लागवड प्रामुख्याने होत असल्याने सध्या त्याठीकाणून पुरवठा नाही.

अजूनही कांदा लागवड करावी
पंचगंगा सीड्स चे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी कांदा बियाणे विक्रीत ४० ते ५० टक्के घट नोंदविली गेली. याचाच सरळ अर्थ असा आहे की तेवढी लागवड कमी झाली. कर्नाटक मधूनही यावर्षी लागवडीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गत कांदा बियाणे वार्षिक मार्केट ३५०० टन इतके असून पंचगंगा त्यातील १५०० टन बियाणे पुरवठा करते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी लवकर बाजारात येणाऱ्या कांद्याच्या बियाण्याची लागवड करावी. कांदा रोप टाकून लागवड करण्यात एक ते दीड महिना लागवड करण्यापेक्षा लवकरात लवकर वाफे पद्धतीवर बी फेकून लागवड करावी. यामुळे उत्पादनात घट येत असली तरीही तेजीच्या काळात कांदा बाजारात दाखल होईल. सदर तंत्राने १० टन+ एकरी उत्पादन घेणे शक्य होत आहे. त्यामुळे जर कांद्याने चांगली तेजी गाठली तर शेतकऱ्याला उत्पन्न हमखास मिळणार आहे.

कांद्याच्या तेजीचे चित्र स्पष्ट आहे. अर्थात दाखल होणारा कांदा हा पारंपारिक कांदा उत्पादक क्षेत्रातून येणारा आहे, कारण अपारंपारिक उत्पादक वर्षा-दीड वर्षाच्या मंदीच्या काळात यातून बाहेर पडले आहेत. म्हणजेच सध्यापेक्षा किमान दुप्पट दर मिळाले तर या पारंपारिक कांदा उत्पादक शेतकऱ्याचे झालेले नुकसान केवळ भरून येणारे असल्याने, कितीही तेजी झाली तरी सरकारने निर्यातीवर बंधने आणू नयेत असे कृषिकिंगचे मत आहे. तसेच सदरची तेजी ही फेब्रुवारी-मार्चपर्यंत टिकेल. त्यानंतर रबी लागवडीचा कांदा, दरम्यान शासकिय हस्तक्षेपाची शक्यता, हवामान बदलाचे संकेत अशा अनेक घटकांच्या प्रभावामुळे कांद्याचे दर पुढील वर्षीही किमान नफा देणारेच राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी होता होईल तशी कांदा लागवड वाढविणे दीर्घकालीन फायद्याचे ठरणारे आहे.टॅग्स