06 June 10:33

तूर, हरभऱ्यासाठी हजार रुपये अनुदान; खरेदीसाठी मुदतवाढ


तूर, हरभऱ्यासाठी हजार रुपये अनुदान; खरेदीसाठी मुदतवाढ

कृषिकिंग, मुंबई: “राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे येत्या गुरूवारपर्यंत (७ जून) शेतकऱ्यांना देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व हरभऱ्याची हमी भावाने विक्री करण्यासाठी ऑनलॉईन पद्धतीने एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र, नाफेडच्या वतीने खरेदी न झालेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यातील कडधान्य आणि तेलबिया उत्पादनांच्या खरेदीच्या आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ-नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चढ्ढा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख हेही यावेळी उपस्थित होते. नाफेडच्या मागणीनुसार राज्यात कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदाम उभारणीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

याशिवाय हरभरा खरेदीला किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून १३ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे राज्य सरकारला मिळाले आहे. त्याबाबत नाफेडलाही सूचना देण्यात आल्या आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.