04 February 11:46

तीन रुपयात कपभर चहा तरी मिळतो का?- शरद पवार


तीन रुपयात कपभर चहा तरी मिळतो का?- शरद पवार

कृषिकिंग, बारामती(पुणे): "केंद्राने अर्थसंकल्पात शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, कुटुंबात साधारण ५ व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांच्या वाट्याला रोज फक्त ३ ते ४ रुपये येतील. इतक्या पैशात हॉटेलमध्ये चहा तरी मिळतो का?," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बारामती येथील माळेगावमध्ये विकासक संस्थेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

तुटपुंजी मदत देऊनही सरकार शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढत असल्याचे मिरवत आहे. शेतकऱ्यांवर दया दाखवू नका. तर शेतमालाला भाव देऊन घामाची किंमत द्या. शेतकऱ्यांना साधन सामग्री दिल्यास शेतकरी खात्रीने देशासमोरील प्रश्न सोडवेल. लाचारीने कोणापुढे काही मागणार नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला आहे.

मराठवाडा, विदर्भात रोजच शेतकरी आत्महत्या होत आहेत. आपण कृषी मंत्री असताना यवतमाळ मधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या रात्री आपल्याला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तात्काळ तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासमवेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन, ७१ हजार कोटींची कर्जमाफी देऊन देशभरातील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता. कर्जावरील व्याजदर १२ टक्क्यांवरून अगदी ३ टक्क्यांवर आणला. परिणामी, भारत जगाला अन्नधान्य पुरवू शकत आहे. देशात उद्योगपतींची कर्ज माफ होत आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हातून गेल्याने मुलीचे लग्न लावू न शकणारा शेतकरी आत्महत्या करत आहे, असेही पवार यावेळी म्हणाले आहे.