10 February 08:30

ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता


ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता

कृषिकिंग, नाशिक/सांगली: सकाळी ढगाळ वातावरण तर रात्री थंडी असे संमिश्र वातावरण सध्या राज्यात अनुभवायला मिळत आहे. त्याचा फटका नाशिक व सांगली जिल्ह्यामधील द्राक्ष पिकासह राज्यातील अन्य पिकांना बसण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तरेकडून आलेल्या थंड हवेच्या लाटेमुळे हवेतील बाष्प एकत्र झाले आणि त्यांचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

हवामान विभागाने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची तर विर्दभात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विचार करता गेल्या आठवड्यात चांगली थंडी होती; मात्र काही दिवसात थंडीचा जोर ओसरुन बुधवारपासून वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे.

त्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाल्याने सांगली व नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार हबकले आहेत. मागील दोन दिवसात धुरकट आणि अधून मधून पावसाचे बारिक थेंब बरसत आहेत. आकाश झाकाळून गेले आहे. याचा सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या द्राक्षबागांवर आणि काढणीनंतर अद्यापही शेतात पडून असलेल्या शाळू पिकांना बसण्याची शक्यता आहे. सांगली आणि परिसरात एक लाख एकराहून अधिक क्षेत्रावर द्राक्षबागा विस्तारल्या आहेत. जवळजवळ सर्वच बागांमध्ये यावर्षी द्राक्षांचा बहर उत्तम आहे. आतापर्यंत सांगलीतील २५ ते ३० टक्के बागांमधील द्राक्षांचे हार्वेस्टिंग झाले आहे. तर उर्वरित ७५ टक्के बागांचे हार्वेस्टींग होणे बाकी आहे.

वातावरणातील बदलामुळे द्राक्षांवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल अशी शक्यता आहे. अशावेळी बागेवर कोणत्या औषधांची फवारणी करावी, कशाप्रकारे बागेची काळजी घ्यावी, याबाबत बागायतदार जागरुक आहेतच. परंतु पावसाचा जोर वाढला तर द्राक्षमणी फुटून मोठे नुकसान होण्याची भीती आहे.टॅग्स