25 June 12:20

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर लगाम ठेवण्यासाठी केंद्राची राज्यांसोबत २९ जुलैला बैठक


जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर लगाम ठेवण्यासाठी केंद्राची राज्यांसोबत २९ जुलैला बैठक

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने राज्य सरकारांसोबत २९ जुलैला एका बैठकीचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर दरम्यान आवश्यक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होऊ न देण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. सामान्यतः या महिन्यांमध्ये आवश्यक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होत असते. सप्टेंबर महिन्यापासून महत्वाच्या सणांचा हंगाम सुरु होतो. या वर्षाच्या शेवटीपर्यंत भाजपशासित मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढ या ३ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या काळात जीवनावश्यक वस्तूंचा दरांमध्ये वाढ झाल्यास, विरोधकांना या मुद्द्याचे आयते कोलित मिळू शकते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्व राज्यांचे अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री उपस्थित असणार आहे.

जुलै ते ऑक्टोबर या काळात डाळी, तेलबिया, बटाटा, कांदा, आणि टोमॅटो या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होते. या काळात या वस्तूंची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असतो. यावर्षी सरकारने नवा फॉरर्मुला वापरत किमान आधारभूत किमतींची घोषणा केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळणार आहे. सध्यस्थितीत डाळी, तेलबिया, बटाटा, कांदा, आणि टोमटो यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर मागील वर्षाच्या निच्चांकी पातळीवर आहे. मात्र, येत्या काळात दिवाळी, दसरा, जन्माष्टमी या महत्वाच्या सणांच्या काळात कृत्रिमरित्या वाढ होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने या बैठकीचे आयोजन केले आहे.टॅग्स