12 January 11:47

जानेवारीत कांदा २००० ते ३५०० तर मार्चपर्यंत तूर ४२००, सोयाबीन ३३०० रुपये क्विंटल राहण्याची शक्यता


जानेवारीत कांदा २००० ते ३५०० तर मार्चपर्यंत तूर ४२००, सोयाबीन ३३०० रुपये क्विंटल राहण्याची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: आगामी मार्चपर्यंत तुरीचे दर कमाल ४२००, सोयाबीन ३३०० तर जानेवारीच्या संपूर्ण महिन्याभर कांद्याचे दर २००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल राहण्याचे भाकीत भारतीय कृषी विपणन माहिती व विश्लेषण केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

शासनाच्या कृषी व पणन विभागाअंतर्गंत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत कृषी पणन व माहिती विश्लेषण सेवा यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे प्रथम तूर, टोमॅटो, सोयाबीन, मका व कांदा या पिकांच्या भावाबद्दल भाकीत वर्तवण्यात आले आहे.

खर्चाच्या तुलनेत भावाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्राचे चाकच फसले आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना धान्य विकावे लागते. हंगामात शेतमालाची आवक वाढून नियंत्रणाअभावी शेतमालाचे भाव पाडले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. वर्षानुवर्षे हीच प्रथा बाजार व्यवस्थेत सुरू असल्यामुळे उत्पादन भरमसाठ होऊनही उत्पन्न मात्र मुद्दलाएवढेही होत नसल्यामुळे आज शेती व्यवसायाची बिकट परिस्थिती झाली आहे.

बडे खरेदीदार, व्यापारी यांना बाजारपेठेचा अंदाज मिळत असल्यामुळे कोणत्या शेतमालाची साठवणूक करायची, कोणता विकायचा याचा निर्णय संबंधित यंत्रणा घेते. परंतु शेतकऱ्यांना बाजारपेठेबाबत माहिती पोहोचवणारी यंत्रणा नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेची संभाव्य भावाबाबत माहिती व्हावी, यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गंत 'कृषी पणन व माहिती विश्लेषण यंत्रणा' एप्रिल २०१६ मध्ये कार्यान्वयीत करण्यात आली आहे.

कृषी पणन व माहिती सेवा यंत्रणेमार्फत एकूण ३० पिकांचा अभ्यास केला जाणार आहे. यात पहिल्या वर्षी सोयाबीन, तूर, मका व टोमॅटो या चार पिकांचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या वर्षी हरभरा, कांदा डाळींब, कापूस, हळद व अंडी या सहा पिकांचा तर तिसऱ्या वर्षी मुग, करडई, बटाटा, द्राक्षे, काजू, लाल मिरची, उडीद, भुईमूग, पोल्ट्री, लिंबू व चौथ्या वर्षी ज्वारी, तांदूळ, गहू, बाजरी, रागी, दूध, आंबा, केळी, संत्रा व चिकू या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.टॅग्स