13 January 13:00

चीन, ऑस्ट्रेलियाला भारतीय द्राक्ष गोड; १५ जानेवारीला चीनला पहिली खेप पोहचणार


चीन, ऑस्ट्रेलियाला भारतीय द्राक्ष गोड; १५ जानेवारीला चीनला पहिली खेप पोहचणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: द्राक्ष हंगाम सुरु झाला असून, भारताकडून चीनला द्राक्षाची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाने भारतीय द्राक्षांसाठी आपली बाजारपेठ खुली केली आहे. मात्र, भौगोलिक कारणास्तव निर्यात होणे थोडं अवघड ठरणार आहे.

कृषी आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) महासंचालक यूके वत्स यांनी सांगितले आहे की, "३३ टन द्राक्षांची पहिली खेप चीनला पाठवण्यात आली आहे, जी १५ जानेवारीपर्यंत चीनच्या बंदरावर पोहचण्याची शक्यता आहे. यावर्षी चीनला दुप्पटीने अधिक निर्यातीचे लक्ष ठेवण्यात आले आहे."

देशातून दरवर्षी ३० कोटी डॉलर मूल्याच्या जवळपास १ लाख ९० हजार टन द्राक्षांची निर्यात केली जाते. या निर्यातीमध्ये सर्वाधिक ३३ टक्के वाटा हा नेदरलँडचा आहे. याशिवाय ब्रिटनला १५ टक्के तर रशियाला १२ टक्के द्राक्षांची निर्यात केली जाते.

२०१७-१८ मध्ये चीनने भारतातून जवळपास १३ लाख डॉलर मूल्याच्या ८२७ टन द्राक्षाची आयात केली होती. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील आयातीमुळे आयात मागील वर्षी मोठी घट झाली होती. मात्र, अमेरिका-चीन यांच्यात झालेल्या व्यापार युद्धामुळे चीनने अमेरिकन फळांवर २५ टक्के आयात शुल्क केले आहे. त्यामुळे अमेरिकन फळांची आयात कमी होऊन भारतीय द्राक्षांचा चीन सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे.