29 November 10:42

चीनला नाशिकची द्राक्ष गोड; ४ हजार ४१० कोटींची बाजारपेठ खुली होणार


चीनला नाशिकची द्राक्ष गोड; ४ हजार ४१० कोटींची बाजारपेठ खुली होणार

कृषिकिंग, नाशिक: नाशिकची द्राक्ष यावर्षी भाव खाणार असं दिसतंय. कारण चीनला नाशिकची द्राक्ष गोड लागली असून, लवकरच नाशिकच्या द्राक्षांना चीनची भली मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. 'अपेडा'च्या मध्यस्तीने घेण्यात आलेल्या या बैठकीला भारतातील १०० निर्यातदार आणि २३ चीनी द्राक्ष आयातदार उपस्थित होते.

भारतातून द्राक्ष आयात करण्यासाठी चीन उत्सूक असून, या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्या अनुषंगाने चीनमधील आयातदारांचे एक पथक लवकरच नाशिकला येऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर चीनची ६३० दशलक्ष डॉलरची (४ हजार ४१० कोटी) बाजारपेठ भारतीय द्राक्षांसाठी खुली होणार आहे.

गेल्यावर्षी भारतातून चीनला फक्त ६.७ दशलक्ष डॉलरची द्राक्ष निर्यात करण्यात आली होती. यावर्षी कृषी व प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) २०० टक्क्यांनी व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्यामुळे नाशिक, तासगाव (सांगली), सोलापूर, पुण्याच्या द्राक्षांना निर्यातीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.टॅग्स