12 July 16:31

चीनच्या घुसखोरीने भारतीय कांद्याला हलका झटका


चीनच्या घुसखोरीने भारतीय कांद्याला हलका झटका

कृषिकिंग, नाशिक: कांदा दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवणूक केली असल्याने सध्या दर स्थिर आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने श्रीलंका, दुबई, सिंगापूर, मलेशिया या देशामध्ये भारतीय कांद्याचे दर वाढताच चीनचा कांदा या बाजारपेठांमध्ये यायला लागला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा भारतीय कांदा प्रति किलोमागे २ रुपयांनी घसरला आहे.

'नाफेड'ने आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून २ कोटींचा कांदा खरेदी केला आहे. अजून २५ हजार टन कांदा खरेदी होणार असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. टंचाई, पाऊस या स्थितीत देशभरातील उन्हाळ कांदा अडचणीत आला आहे. या स्थितीत राज्यातील कांद्याला मागणी वाढली आहे. नाफेडकडून राज्यात होत असलेल्या कांदा खरेदीमुळे चांगले दर मिळण्यास मदत होत आहे. तसेच यावर्षी पाऊस फक्त ठराविक भागामध्येच कोसळत असल्याने कांदा क्षेत्रात त्याने पाठ फिरविली आहे. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी दिल्ली शहरात किरकोळ बाजारात कांदा दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा संताप परवडणार नाही म्हणून वाढत्या कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापासूनच नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमधून हा कांदा खरेदी करण्यात येत अाहे. उर्वरित कांदा पुणे परिसरातून खरेदी केला जात आहे. या आठवड्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदयाला सध्या ७०० रुपयांपासून ते १२०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी देखील कांदा साठवणूक करून ठेवली आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरात चाळी कांद्याने भरलेल्या दिसून येत आहे.टॅग्स